हिंजवडी, माण, मारुंजी यांच्या साठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे- खासदार सुप्रिया सुळे


पिंपरी चिंचवड : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारूंजी आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या संदर्भाने येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हिंजवडीसह माण, मारुंजी या गावांमधील पायाभूत सुविधा आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्दे मार्गी लावण्यासाठी राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारुंजी यांचा समावेश करुन येथे सक्षम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. या माध्यमातून या भागातील अडीअडचणी सोडविणे अधिक सोपे होईल.
शिवाय त्यासाठी लागणारा वेळ देखील वाचेल. परिणामी या भागातील नागरिकांनाही त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.येथील पायाभूत सुविधांची जबाबदारी घेणारी कोणतीही निश्चित अशी यंत्रणा नाही
. त्यामुळे अनेकदा एमआयडीसी, महापालिका पुणे किंवा पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, महावितरण, मेट्रो, पोलीस अशा विविध आस्थापनांकडे यासंदर्भातील तक्रारी द्याव्या लागतात.
बरेचदा त्या एकमेकांशी संबंधित असल्याने त्या सोडविणे तुलनेने अधिक जटील होऊन बसते. यामुळे अलिकडच्या काळात रस्ते, वीज, पाणी यांसारख्या सुविधांच्या संदर्भाने काही गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या खेरीज या परिसरातील वाहतूक तसेच आयटी कर्मचारी, नागरीक यांना येथे सुरक्षित वातावरण निर्माण करुन देणे देखील आवश्यक आहे.
या सर्व मुद्यांचा विचार करता त्या सोडविण्यासाठी विविध आस्थापनांकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. परिणामी त्यासाठी लागणारा वेळ देखील जास्त आहे.
याचा नागरीकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. ‘राजीव गांधी आयटी पार्क’चे जागतिक व्यापार नकाशावरील स्थान लक्षात घेतले तर येथे अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण होणे खेदजनक आहे
या भागामध्ये ये जा करणारा नोकरदार वर्ग तसेच येथील स्थानिक नागरिक या सर्वांचा विचार करता तातडीने मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
याबाबत दिलेले पत्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे, बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी परिसरात जागतिक दर्जाचे ‘राजीव गांधी आयटी पार्क’ आहे. येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या जगभरातील अग्रगण्य कंपन्या आहेत. देशातील महत्वाच्या आयटी पार्कमध्ये याचा समावेश होते.