कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास, योग्य वेळी सत्य बाहेर येईल:रोहिणी खडसे


पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- रोहिणी खडसे यांनी त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी परिसरात कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी पतीची पाठराखण केली आहे
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला ऑनलाइन हाऊस पार्टीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार खराडी येथील एका फ्लॅटवर छापा टाकला असता, तिथे अंमली पदार्थ, हुक्का आणि दारूचे सेवन सुरू असल्याचे आढळले
या कारवाईत प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली. पोलिसांनी ४१ लाख रुपये किमतीचे कोकेनसदृश पदार्थ आणि ७० ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त केले आहेत. अटक केलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली असून, रक्त तपासणीच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.