समाजातील वास्तव वृत्तपत्र छायाचित्रकार मांडतात भूमिका महत्त्वाची – श्रीपाद सबनीस

ps logo rgb

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल आयोजित छायाचित्र प्रदर्शन समारोप

पिंपरी, पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

(दि. ०२ सप्टेंबर २०२५) छायाचित्रकार हा एक समाजातील वास्तव मांडणारा चौकस बुद्धीचा उत्कृष्ट कलाकार असतो. वृत्तपत्र छायाचित्रकार समाजातील दुःख, वेदना आणि आनंद जनतेपर्यंत अविरत पणे पोहोचवतो. त्यांच्यामुळेच समाजातील वास्तव पुढे येत असते. असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आलेल्या ३ दिवसांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते.
शहरातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे ३०० छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली होती.
या स्पर्धेत अनंत टोले (दैनिक पुढारी) प्रथम, आशिष काळे (महाराष्ट्र टाइम्स) द्वितीय आणि प्रमोद शेलार (सकाळ) यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र, पुणे फेस्टिव्हलचे स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अंकुश काकडे, माजी महापौर प्रशांत जगताप, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी आदी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले की, या प्रदर्शनातील सहभागी छायाचित्रकारांनी समाजातील वास्तव अतिशय डोळसपणे टिपले आहे. त्यांची योग्य दखल समाजाने घेतली पाहिजे.
पुणे फेस्टिव्हलने वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे.”
प्रास्ताविकात अभय छाजेड यांनी सांगितले की, या प्रदर्शनात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच पुणेकरांनीही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”
कृष्णकुमार गोयल म्हणाले, वृत्तपत्रातील छायाचित्रकारांचे हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकर आवर्जून येतात. त्यांच्या कलेचे हे कौतुक खरोखरच उल्लेखनीय आहे.”
या छायाचित्र प्रदर्शनाचे परीक्षण जेष्ठ छायाचित्रकार मिलिंद वाडेकर व सागर गोटखिंडीकर यांनी केले.