आपलं ताटातलं आरक्षण सुरक्षित ठेवणं जास्त महत्त्वाचं:लक्ष्मण हाके

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
लक्ष्मण हाके यांनी बंजारा समाजालाही थेट आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की, “हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावं, अशी बंजारा समाजाची मागणी आहे. पण आपलं ताटातलं आरक्षण सुरक्षित ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. डोंगराच्या पलीकडचं महाल कधी मिळेल, याची शाश्वती नाही. पण आजचं झोपडं वाचवणं आवश्यक आहे
. ओबीसींमध्ये फूट पडेल असं कुठलंच पाऊल उचलू नये.” त्यांच्या या विधानामुळे बंजारा समाज आणि इतर ओबीसी घटकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.दुसरीकडे, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात हजारो लोकांनी पारंपरिक वेषभूषा करून मोर्चात भाग घेतला. “
जय सेवालाल” आणि “एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसील कार्यालयात सभा घेऊन त्यांनी मुंबईत मोर्चा नेण्याचा इशारा दिला. अकोल्यातही बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पारंपरिक पोशाखातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले.
एसटी आरक्षणासाठी सुरू झालेलं हे आंदोलन आता राज्यव्यापी पातळीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.हिंगोलीत पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. कळमनुरी येथे झालेल्या ओबीसींच्या (OBC) एल्गार मोर्च्यात लक्ष्मण हाके यांनी जोरदार भाषण करत मराठा आरक्षणासाठी काढलेल्या शासन निर्णयावर संताप व्यक्त केला. “हा जीआर म्हणजे ओबीसींच्या हक्कावर गदा आहे. आमच्या हक्काचं आरक्षण संपवण्याचा डाव रचला जातोय. त्यामुळे यापुढे दांडके नाही तर कोयते घेऊ,” असा इशारा त्यांनी दिला.
