प्रारूप मतदार यादी आता 20 नोव्हेंबर रोजी जाहीरहोणार

पुणे |
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. यानुसार प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबरऐवजी आता 20 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून, अंतिम मतदार यादी 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी मतदार यादी तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकानुसार 6 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे ठरले होते. त्यानंतर हरकती मागवून त्यांचा विचार करून अंतिम मतदार यादी 10 डिसेंबर रोजी प्रकाशित करण्याचा कार्यक्रम ठरला होता.
मात्र नंतर आयोगाने तो बदलून 14 नोव्हेंबर रोजी प्रारूप यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. आता या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करत 20 नोव्हेंबर ही नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे. या बदलांमुळे मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि हरकती दाखल करण्याची प्रक्रिया काही दिवसांनी पुढे ढकलली गेली आहे.
या बदलांमुळे निवडणूक प्रक्रियेतील तयारीला काहीसा विलंब झाला असला, तरी आयोगाने मतदारांना योग्य आणि अद्ययावत यादी मिळावी यासाठी वेळ दिल्याचे सांगितले जात आहे. पुणेकर मतदारांसाठी आता 20 नोव्हेंबरपासूनच यादी पाहण्याची आणि दुरुस्त्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
महापालिका निवडणूक सुधारित मतदार यादी कार्यक्रम
- 20 नोव्हेंबर : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार
- 27 नोव्हेंबर : प्रारूप यादीवर हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख
- 5 डिसेंबर : हरकतींचा विचार करून सुधारित अंतिम यादी प्रसिद्ध
- 8 डिसेंबर : मतदान केंद्रांवर यादी प्रदर्शन
- 12 डिसेंबर : मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर
