भारतीय संविधानाने दिला प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर….

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व सामुहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन …
पिंपरी, २६ नोव्हेंबर २०२५ : भारतीय संविधानामळे आपल्या देशातील नागरिकांना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी देणारा अमूल्य ठेवा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेले संविधान प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार तर देतेच, त्याचबरोबर अधिकार व कर्तव्यांची जाणीवही करून देते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनही याच संविधानिक मूल्यांनुसार पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख कामकाज करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ,अभिमान भोसले, विशेष अधिकारी किरण गायकवाड,काॅम्पुटर ऑपरेटर सुरेश तनपुरे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार केला. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
तसेच पिंपरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भिमसृष्टी) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, संतोष जोगदंड,धम्मराज साळवे, संजय बनसोडे, प्रकाश बुक्तर, सुरेश रोकडे, गिरीश वाघमारे, दत्ता खानबीर, राजन नायर, रफिक कुरेशी, दीपक म्हेत्रे, नितीन गवळी, कांचन वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
