कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली!

ps logo rgb

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पिंपरी/संत तुकाराम नगर (प्रतिनिधी) दि.९ डिसेंबर २०२५ :– अल्फा लवाल लिमिटेड कंपनीतील तब्बल ४०२ कामगारांना बेकायदेशीर रित्या अकरा वर्षांपूर्वी कंपनीतून काढून टाकण्यात आले होते. त्यासंदर्भात कामगारांना कामावर घेणे व संघटनेचा नाम फलक लावण्या संदर्भात लाक्षणिक उपोषणाची दिशा ठरवण्यासाठीची बैठक राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे (दि.९) रोजी संपन्न झाली.दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी म्हटल्या नुसार राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले व अल्फा लवल लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाची बैठक पाच दिवसानंतर पोलिसा समवेत होणार असून आज होणारे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. बाबा आढाव यांना बैठकीमध्ये दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली साठी मौन बाळगण्यात आले. यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी नंदू आप्पा कदम, दिनेश पाटील, दिपक पाटील यासहित महाराष्ट्रातून आलेले ३०० कामगार उपस्थित होते. यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, तेरा वर्ष न्यायालयात तारखावर तारखा चालू असून त्यामुळे किती कामगार मरतात याची वाट कंपनी बघतेय का? असा संशय निर्माण झाला आहे. कामगारांचे सर्व पुरावे संघटनेच्या वतीने सादर करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. कामगारांचा तेरा वर्षाचा संघर्ष चालू असून श्री रामाप्रमाणे १४ वर्षाचा वनवास लवकरच संपून आपल्याला न्याय मिळेल. न्यायालयात “तारीख पे तारीख” चालू राहणार असेल तर कंपनीने कामगारांना कामावर घेऊन कायमस्वरूपी कामगाराप्रमाणे वेतन देण्यात यावे. संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते त्या विरोधात कंपनीकडून पोलिसांना पत्र जातेच कसे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलन रोखण्यासाठी कंपनीने पोलिसांना चुकीची माहिती दिली. न्याय मिळवायचा असेल तर कामगारांची एकजूट महत्वाची आहे.

उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कसाही लागो तो आम्हाला मान्य असेल. परंतु कामगारांना कामावर घेऊन त्यांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे ८० ते ९० हजार वेतन देण्यात यावे व निकाल लागल्यानंतर मृत्यू झालेल्यांच्या वारसांना कामावर घ्यावे. निकाल लवकर लागून कामगारांना वेतनाचा फरक मिळायला हवा. पाच दिवसांनी होणाऱ्या बैठकीमध्ये कंपनीने कामगारांना कामावर घेतले नाही तर कामगार आंदोलन करू शकता अशी हमी पोलिसांनी दिली आहे. जेवढे कामगार आज बैठकीला उपस्थित आहेत त्यांना कामावर घेण्यासाठी विनंती करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीच्या कामगारांचा प्रश्ना सहित अनेक कामगारांचे प्रश्न उपस्थित करून मार्गी लावण्याचे साकडे घालणार असल्याचे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.

नंदू आप्पा कदम म्हणाले की, कामगारांनो काळजी करण्याची गरज नसून कामगार क्षेत्रातील निस्वार्थी नेतृत्व कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आपल्या सोबत उभे आहेत. संत तुकाराम नगर हॉल या ठिकाणी अनेक बैठका व सभा झाल्या त्या यशस्वी ही झाल्या त्याचप्रमाणे तुम्हालाही ते न्याय मिळवून देतील हा विश्वास आहे. तीन वर्ष कामावरून काढून टाकलेल्या सेवा विकास बँकेतील कामगारांना त्यांनी नुकतेच एक ते तीन लाख रुपये मिळवून दिले आहेत हा त्यांचा विजय वाखाण्याजोगा आहे. कामगारांसाठी लढणारे यशवंतभाऊ हे वादळ आहेत त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता भाऊंसोबत तटस्थपणे कामगारांनी उभे राहावे तरच न्याय मिळेल.

बैठकी मध्ये उपस्थित कामगारांच्या होकारानंतरच कंपनी व्यवस्थापनाला पाच दिवसाची मुदत देण्यात आल्याचे ठरले. तसेच संघटनेचा फलक लावण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. पोलिसांनी घेतलेल्या जबाबदारी नुसार त्यांच्या सूचनेमुळे होणारे आंदोलन तुरदास स्थगित करण्यात आले असून भविष्यात होणाऱ्या आंदोलनास कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.

Latest News