दिव्यांग बांधवांच्या मतदान जनजागृती रॅलीतून लोकशाहीचा देण्यात आला सशक्त संदेश

Backup_of_ps logo rgb

पिंपरी, दि. ४ जानेवारी २०२६ : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो… माझं मत, माझा अधिकार… मतदान हा हक्क आमचा, लोकशाहीचा अभिमान आमचा… या घोषणांच्या गजरात दिव्यांग मतदारांनी लोकशाहीच्या सशक्ततेचा संदेश देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित मतदान जनजागृती रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम शहरातील विविध भागांत राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज दिव्यांग बांधवांच्या सहभागातून भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली निगडी प्राधिकरण येथील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय येथून सुरू होऊन बिजली नगर, वाल्हेकर वाडी, चापेकर चौक, चिंचवड मार्गे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पोहोचली. रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या.

सदर रॅलीचा समारोप चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे करण्यात आला. यावेळी मतदान जनजागृतीसाठी सादर केलेल्या फ्लॅश मॉबने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच उपस्थितांना, ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,’ अशी मतदानाची शपथ देण्यात आली. या रॅलीमध्ये दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
…..
कोट

लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रत्येक मत अत्यंत मौल्यवान आहे. दिव्यांग बांधवांचा मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग समाजासाठी प्रेरणादायी असून, हा संदेश या रॅलीतून दिला गेला आहे. दिव्यांग बांधवांमुळे ही रॅली यशस्वी झाली आहे.

  • तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
    …..
    कोट

पिंपरी चिंचवड शहरात दिव्यांग मतदारांची संख्या मोठी आहे. हे सर्व मतदार प्रत्येक निवडणुकीत केवळ मतदानच करीत नाहीत तर त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना देखील मतदान करण्यासाठी जनजागृती करीत असतात. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आदर्श सर्वानी घ्यावा.

  • प्रफुल्ल पुराणिक, जनता संपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Latest News