निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या द्वितीय प्रशिक्षणास सुरूवात….

पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२६ (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मतमोजणी ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची प्रक्रिया असून यामध्ये कोणतीही चूक होऊ नये, यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने नियम, तांत्रिक बाबी व आपली जबाबदारी पूर्णपणे समजून घेत कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावरील द्वितीय टप्प्यातील प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. आज आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि माडगूळकर सभागृह येथे पार पडलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय २ मधील मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते.
निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रशिक्षणादरम्यान समन्वय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र कुलकर्णी, चंद्रकांत मुठाळ, राजाराम सरगर तसेच मुख्य प्रशिक्षक सतीश मेहेर, अविनाश वाळुंज, रामेश्वर पवार, नरेंद्र बंड यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने प्रशिक्षणास उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता, अचूकता व शिस्त यावर भर देत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. मतमोजणीदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे, ईव्हीएम हाताळताना दक्षता बाळगणे तसेच प्रत्येक टप्प्यावर निर्धारित कार्यपद्धतीनुसारच कामकाज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी, निष्काळजीपणा किंवा नियमभंग टाळण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या नीट समजून घेऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
तीन सत्रांमध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) प्रत्यक्ष मतदान व मतमोजणीच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ईव्हीएम, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत, निवडणूकविषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, टपाली मतदानाची प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी तसेच मतदान यंत्रांची तपासणी आदी बाबींचा समावेश होता.
तसेच मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची रचना, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
याशिवाय मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परिसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा तसेच आकस्मिक व महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये करावयाची कार्यवाही याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ईव्हीएम, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट हाताळण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील यावेळी दाखविण्यात आले.
