बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरीसह १ लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐतिहासिक घोषणा

Backup_of_ps logo rgb

आमदार शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

​पिंपरी-चिंचवड: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) चिंचवड विधानसभेतील बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी आणि परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे, आता १ लाखाहून अधिक घरांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन येथे आयोजित भव्य जाहीर सभेत राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या क्रांतीकारी निर्णयांची घोषणा केली. शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे भाजपच्या प्रभाग १७ मधील अधिकृत उमेदवार आशा सूर्यवंशी, नामदेव ढाके, पल्लवी वाल्हेकर आणि सचिन चिंचवडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत हे निर्णय जाहीर करण्यात आले. यावेळी आमदार शंकर जगताप यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना महसूल मंत्री म्हणाले की, शंकर जगताप यांच्यासारख्या अभ्यासू लोकप्रतिनिधीमुळेच आज चिंचवडमधील प्रलंबित महसूल प्रश्न सुटले आहेत. यावेळी, शामराव वाल्हेकर, तात्यासाहेब आहेर, माजी नगरसेवक श्रीधर वाल्हेकर, राजेंद्र साळुंखे, संदीप चिंचवडे, स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, मनोज तोरडमल, विनोद कांबळे, श्रुती तोरडमल, खंडूदेव कठारे, सचिन शिवले, निलेश भोंडवे, दिलीप गोसावी, दिलीप गडदे, वाल्मिक शिवले, चंद्रहास वाल्हेकर, संदीप शिवले, प्रवीण वाल्हेकर, शिरीष कर्णिक, कविता दळवी, ग्रेस कुलकर्णी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील घरांना आता अधिकृत ‘राजमान्यता’ मिळणार असून, बँकिंग व्यवहार, कर्ज आणि मालमत्तेची विक्री सुलभ होणार आहे. “राष्ट्रवादीच्या काळात जो शास्तीकराचा अन्याय झाला, तो पुसून टाकून आता भाजप प्रत्येकाच्या हातात मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देत आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. सभेला संबोधित करताना महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ‘तुकडा बंदी कायदा’ रद्द केला आहे. या निर्णयामुळे शासकीय जागांवरील अनधिकृत घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न निकाली निघाला असून, निवडणुकीनंतर अशा सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकार घेणार आहे. आमदार शंकर जगताप यांनी या तांत्रिक विषयावर मंत्रालयात वारंवार बैठका घेऊन हा मार्ग मोकळा केला, ज्याचा फायदा १ लाखांहून अधिक कुटुंबांना होणार आहे.

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता पिंपरी-चिंचवडमध्ये ‘नक्षा’ योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हे केला जाणार आहे. यामुळे प्रत्येक घराचा अधिकृत सरकारी नक्षा नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी लागणारा प्रत्येकी ४ हजार रुपयांचा तांत्रिक खर्च देखील शासन ‘विशेष बाब’ म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना हे कार्ड पूर्णपणे मोफत मिळणार आहे. ​यावेळी बावनकुळे यांनी शहरासाठी आणखी दोन मोठ्या घोषणा केल्या. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील गरजू नागरिकांसाठी १ लाख नवीन घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच, महिला सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी प्रभागातील २००० बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे.

यावेळी निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी 2017 पासून शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेल्या प्रगतीचा आलेख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडला. आगामी काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेला प्रगतीच्या मार्गावर कायम ठेवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून ”विकासाचे व्हिजन” साध्य करायचे आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना 15 जानेवारी रोजी मतांच्या रूपाने पाठिंबा द्यावा असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले

Latest News