प्रभाग १७ च्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमत द्या – अजित पवारांचे आवाहन

Backup_of_ps logo rgb

चिंचवड प्रतिनिधी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) प्रभाग क्रमांक १७ मधील अनधिकृत घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड देत अधिकृत करण्याचा ठाम निर्धार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वाल्हेकरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, भाऊसाहेब भोईर यांचे वडील स्व. सोपानराव भोईर हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते. त्यांच्या कुटुंबाला महापालिका प्रशासनाचा मोठा अनुभव असून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी प्रभाग क्रमांक १७ मध्ये केलेली विकासकामे वाखाण्याजोगी आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरी सुविधा या सर्व बाबींमध्ये त्यांनी सातत्याने काम केले असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवार मनीषाताई आरसुळ, भाऊसाहेब भोईर, शोभाताई वाल्हेकर आणि शेखर चिंचवडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, भाऊसाहेब भोईर यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच प्रशासनातील दांडगा अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या विकासकामांसाठी निश्चितच होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सभेला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Latest News