मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर ”श्रेया बुगडे” यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर….

पिंपरी चिंचवड महापालिकेने केले विशेष उपक्रमाचे आयोजन, प्रभातफेरी, फ्लॅश मॉब व पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती….
पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध मतदान जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दुर्गादेवी टेकडी परिसरात ‘वॉकेथॉन फॉर मतदान’ या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवण्यात आला,या जनजागृतीपर कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक, युवक, महिला सहभागी झाले होते.
दुर्गादेवी टेकडी ,निगडी येथील मुख्य रस्त्यापासून ते पायथ्यापर्यत अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते मतदान जनजागृती करणाऱ्या पत्रकांचे प्रतिनिधिक स्वरूपात निसर्गप्रेमी तसेच नागरिकांना वाटप करून या मतदान जनजागृती प्रभातफेरी कार्यक्रमाची सुरुवात झाली.या फेरीदरम्यान ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ आणि ‘मतदान करा,मतदान करा -१५ जानेवारीला मतदान करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मतदान जनजागृतीसाठी यावेळी सादर करण्यात आलेल्या फ्लॅश मॉबने उपस्थितांची विशेष मने जिंकली. तसेच प्रभावी संदेश देणारे पथनाट्य सादरीकरणही करण्यात आले. या सादरीकरणांमधून मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी ठळकपणे अधोरेखित करण्यात आली.
याप्रसंगी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाल्या, ‘पिंपरी चिंचवड महापालिका मतदान जनजागृतीसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, हे कौतुकास्पद आहे. मतदान हा आपला हक्कच नाही तर कर्तव्य देखील आहे. आपल्या पुढील पिढीसाठी येत्या १५ जानेवारीला नक्की मतदान करा. युवकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करून इतरांना देखील यासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता मतदान करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे,’ असे देखील त्या म्हणाल्या.
यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करायची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे यावे.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
मतदानाची घेतली शपथ
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली,तसेच १००% मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
……
सेल्फीचा उत्साह…..मतदानाचाही निर्धार!
दुर्गादेवी टेकडी येथे आयोजित ‘वॉकेथॉन फॉर मतदान’ कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. नागरिकांचा हा उत्साह पाहून श्रेया बुगडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत महत्त्वाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “माझ्यासोबत जसा तुम्ही उत्साहाने सेल्फी काढता, तसाच उत्साह दाखवत मतदानही नक्की करा.मतदान करूनच आपण लोकशाही अधिक बळकट करू शकतो.’ त्यांच्या या शब्दांनी उपस्थित नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, सेल्फीच्या माध्यमातूनही मतदान जनजागृती प्रभावीपणे साध्य झाल्याचे चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळाले.
