पिंपरी चिंचवडच्या नूतन महापालिका इमारतीला अजितदादांचे नाव द्या; पिंपरी काँग्रेस नेते विशाल जाधव यांची मागणी

पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करणारे आधुनिक शिल्पकार मा. ना. अजितदादा पवार यांच्या कार्याचा यथोचित गौरव होणे गरजेचे आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव देण्यात यावे आणि शहरात त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जावा,” अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नेते व प्रभाग क्रमांक 28 चे अधिकृत उमेदवार विशाल अनंतराव जाधव यांनी केली आहे.
आज विशाल जाधव यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडला विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी अजितदादांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. आयटी हबपासून ते ऑटोमोबाईल हबपर्यंत शहराची झालेली प्रगती त्यांच्या कल्पक नेतृत्वाचे फळ आहे.
प्रेस नोटमधील ठळक मुद्दे:
अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी चिंचवडची ओळख ‘बेस्ट सिटी’ म्हणून झाली.
नवीन महापालिका इमारतीचे नामकरण ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भवन’ करण्याची मागणी.
शहरातील नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुतळा उभारण्याची विनंती.
यावेळी बोलताना विशाल जाधव म्हणाले की, “राजकारणापलीकडे जाऊन शहराच्या विकासाचा विचार करणे आवश्यक आहे. अजित दादा पवार हे पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.ज्या नेत्याने हे शहर घडवले, त्यांच्या नावाचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे.” या मागणीचा विचार न झाल्यास आगामी काळात तीव्र लोकभावना व्यक्त केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
