“माझ्या नावाचा गैरवापर करून ठराव मंजूर; संबंधितांवर कारवाई करा” – आयुक्त व स्थायी समिती सभापतींकडे निवेदन

sandip waghere

संदीप वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आयुक्त तसेच स्थायी समिती सभापती यांना निवेदन देत स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६, विषय क्रमांक ७ बाबत गंभीर आक्षेप नोंदविला आहे.

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये मा. शिक्षण समिती सभा ठराव क्रमांक ७ दिनांक ०२/०४/२०२६ अन्वये नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या डॉकेटनुसार सदर विषयामध्ये नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव “सूचक” म्हणून तसेच श्री विकास साने यांचे नाव “अनुमोदक” म्हणून नोंदविण्यात आले होते.

मात्र, सदर विषयास आपण कोणतीही संमती दिलेली नसून कोणताही ठराव सुचविलेला नाही, असे स्पष्ट करत नगरसेवक वाघेरे यांनी नगरसचिव कार्यालयाकडून दिशाभूल झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आपल्या नावाची करण्यात आलेली नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, संबंधित विषयामध्ये यंत्रमाग व जगदंब या दोन्ही संस्था शासनाच्या असतानाही जगदंब संस्थेच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रति विद्यार्थी व प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :

स्थायी समिती ठराव क्र. ३६६, विषय क्र. ७ तात्काळ रद्द करण्यात यावा.
त्यांच्या नावाची चुकीची नोंद रद्द करण्यात यावी.
संबंधित प्रकरणात दिशाभूल करणाऱ्या नगरसचिव व संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Latest News