महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र….

पुणे : पुणे शहरातील सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख चौक तसेच पोलीस चौक्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून आले. काही कॅमेऱ्यांची वॉरंटी संपल्यामुळे ते बंद पडले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते खोदकामादरम्यान केबल्स तुटल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. तसेच अनधिकृत बांधकामे, होर्डिंग्ज आणि टपऱ्यांमुळे कॅमेऱ्यांचे दृश्य अडथळले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे, असे महापौर नागपुरे यांनी पत्रात नमूद केले आहे.शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कार्यरत आणि प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यक असल्याचे महापौरांनी अधोरेखित केले आहे. त्यानुसार शहरातील सर्व कॅमेऱ्यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करण्यात यावे, नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पुण्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. मुलगी आपल्या आई-वडिलांसह पुण्यात राहत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ती आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. १ मे ला अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू द्याखवायला नेतो, असे सांगून तिला आपल्या सोबत नेते आणि तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकराणातील आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत नवले पुलावर रास्ता रोको आंदोलनही केले. या नंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचे आश्वासन दिले.
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यक्षम करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नसरापूर व म्हाळुंगे परिसरात नुकत्याच घडलेल्या बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीचे पत्र देत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच सरकारी शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच नियमित देखभाल आणि सातत्यपूर्ण मॉनिटरिंगसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी सूचनाही पत्राद्वारे देण्यात आली आहे. संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा आणि त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी,
नसरापुरातील संतापजनक घटना
