पुनावळेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार? अंडरपासचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे शंकर जगताप यांचे आश्वासन

पुनावळे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) ताथवडे–पुनावळे परिसरातील वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी भाजपाचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. अंडरपासच्या कामाला येत्या सहा महिन्यांत सुरुवात करण्यात येणार असून, सोसायटीधारकांच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, कचरा संकलन, ड्रेनेज व्यवस्था, पोलीस गस्त आणि सांस्कृतिक सुविधांसह विविध प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पुनावळे परिसरातील सोसायटीधारक आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी काटेवस्ती येथील व्हीजे इन्फिनिटी सोसायटीमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका रेश्मा भुजबळ, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, भाजपाचे राम वाकडकर, राहुल काटे यांच्यासह विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंडरपासच्या कामाला गती; वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा
ताथवडे–पुनावळे परिसरातील अरुंद आणि कमी उंचीच्या अंडरपासमुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. या प्रश्नावर बोलताना आमदार शंकर जगताप यांनी अंडरपासच्या सर्व्हिस रस्त्यांची कामे मार्गी लागल्याचे सांगितले. मुख्य अंडरपासची उंची चार मीटर ठेवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला असून, कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ठेकेदार निश्चित झाला असून, वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अंडरपासच्या कामाला येत्या सहा महिन्यांत सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परिसरातील कनेक्टिंग रोडचे प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या समस्यांवर स्वतंत्र बैठक
पुनावळेतील नव्याने विकसित झालेल्या भागात अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. सोसायटीधारकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. प्रस्तावित ऑक्सिजन पार्कच्या जागेजवळ पाण्याची टाकी उभारण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
तसेच, ताथवडे येथील रोहन अनंता सोसायटीच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांची दखल घेण्यात आली. ड्रेनेज लाइनसह अन्य नागरी प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कचरा संकलन सुधारणार; कचरा डेपो होणार नसल्याची ग्वाही
परिसरातील कचरा संकलनातील अडचणी आणि कचरा संकलन केंद्राबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. यावेळी पुनावळे परिसरात कचरा डेपो होणार नसल्याची ग्वाही जगताप यांनी दिली. कचरा संकलन व्यवस्था सुधारण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण लक्षात घेता, २०४१ पर्यंत दररोज सुमारे पाच हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त आणि चौकीची मागणी
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमित पोलीस गस्त वाढविणे आणि पोलीस चौकीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जनसंवादात चर्चा झाली. पोलीस स्टेशनसंबंधीच्या मागण्यांवरही संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सोसायट्यांच्या आवारातील वृक्ष छाटणीसाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी केली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वृक्ष छाटणीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
सांस्कृतिक सभागृह आणि ऑक्सिजन पार्कसाठी प्रयत्न
परिसरातील सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यासाठी नव्या विकास आराखड्यातील टाउन हॉलसाठी राखीव जागा विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. पुनावळेतील मोकळ्या जागा आणि हिरवळ जतन करण्यासाठी ऑक्सिजन पार्क उभारण्याचाही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार – शंकर जगताप
“लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत सोसायटीधारकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाची जाणीव ठेवून त्यांच्या नागरी प्रश्नांना पहिले प्राधान्य दिले आहे. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, सक्षम ड्रेनेज व्यवस्था, सुरळीत कचरा संकलन आणि नागरिकांची सुरक्षितता या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करू. ताथवडे–पुनावळे अंडरपासच्या कामाला सहा महिन्यांत सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पुनावळे–ताथवडेचा नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
