पुण्यातील भवानी पेठेमध्ये सर्वाधिक 56 कोरोनाचे रुग्ण

पुणे : शहराचा मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या भवानी पेठेत शनिवारी रात्रीपर्यंत सर्वाधिक 56 कोरोना विषाणू पॉझेटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण कोथरूड-बावधन आणि वारजे- कर्वेनगर या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सापडले आहेत. या दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात ज्या भागात कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत, त्या भागातील एक किलोमीटरच्या परिघात महापालिका प्रशासनाकडून सर्व्हे केला जात आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून सर्दी, खोकला, ताप असे आजार असणार्या नागरिकांवर उपचार केले जात आहेत. याशिवाय त्या परिसरात औषध फवारणीही केली जात आहे. याशिवाय शहरात संचारबंदी करून शहरातील दाट लोकवस्तीचा आणि सर्वाधिक रुग्ण आढळणारा भाग सील करण्यात आला आहे. मात्र, या साथीचे गांभीर्य जेवढे प्रशासनाला आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणार्यांना आहे, तेवढे गांभीर्य नागरिकांमध्ये दिसत नाही. शहरात संचारबंदी लागू असतानाही रस्त्यावर शुकशुकाट असतो. गल्ल्या आणि वस्त्यांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. चेहर्याला मास्क लावणे किंवा रुमाल बांधणे बंधनकारक असताना काहीच न बांधता लोक वावरताना दिसतात. परिणामी शहरात कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मृत्यू होणार्यांचीही संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून पॉझिटिव्ह रुग्ण आढळणार्या परिसराचा अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासानुसार शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या आणि सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या भवानी पेठ आणि कसबा – विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शनिवारपर्यंत (दि. 11 एप्रिल) सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात सर्वप्रथम रुग्ण सापडलेल्या सिंहगड रस्ता परिसरात आजपर्यंत पाच रुग्ण सापडले असून सर्वात कमी रुग्ण कोथरूड-बावधन आणि वारजे- कर्वेनगर या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.