‘फोटो काढून मदत करताना प्रसिद्धीवर फौजदारी गुन्हा दाखल होणार-प्रांताधिकारी नागेश पाटील

इस्लामपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुकारलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात गरजू लोकांना मदत वाटप करताना फोटो काढून प्रसिद्धी मिळविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा वाळव्याचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिला आहे. अशा प्रकारावेळी सरळसरळ सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचा :सांगली : इस्लामपूर शहर तीन दिवस १०० टक्के बंद याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रांताधिकारी पाटील यांनी म्हटले आहे की, सध्या लॉकडाऊनमुळे अनेक गरीब लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी समाजातून मदतीचे हात पुढे येणे साहाजिकच आहे. मात्र काही लोक मदतवाटपावेळी केवळ प्रसिद्धीसाठी फोटो व व्हिडिओ शुटींग करीत आहेत. अशावेळी सरळ सरळ सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे कोणी वैयक्तिकरीत्या अशी मदत वाटप करुन फोटो सेशन केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. ज्यांना कोणाला गरजू लोकांना मदतीचे कीट वाटप करायचे आहे. त्यांनी वैयक्तिकरीत्या ते वाटप न करता ती मदत ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालयात जमा करावी असे आवाहनही प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.