दिल्ली उपराज्यपालांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव


नवी दिल्ली – दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून १३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज सकाळी ही माहिती समोर आली आहे. देशात आता अनलॉक १.० सुरू झाला असून कोरोना संक्रमितांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. त्यानुसार दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांवर गेला आहे. दिल्लीतील राज्यपालांच्या कार्यालयातील १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतक्या मोठ्या संख्येत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकच खळबळ माजली आहे. सध्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, दिल्लीत सोमवारी चार दिवसानंतर एक हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले होते. त्या आधी २८ ते ३१ मे या कालावधीत शहरात सलग हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या २० हजार ८३४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा ५२३ इतका झाला आहे.