मुसळधार पावसामुळे नुकस-भरपाई लवकर देणार – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी प्रतिनिधी :निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत 2 दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वा-याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किना-याला आणली असून यावरील 13 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वँब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सामंत म्हणाले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील असे ते म्हणाले. मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले.

Latest News