रायगड जिल्ह्यात पुढील 38 तासात परिस्थिती पूर्ववत करण्याच प्रयत्न -जिल्हाधिकारी निधी चौधरी

रायगड : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार उडाला आहे. वादळाने झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पुढील 38 तासात परिस्थिती पूर्ववत करण्याच प्रयत्न आहे. त्याचबरोबर नुकसानग्रस्त भागाचा त्वरित पंचनामा करुन अहवाल पाठवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं.रस्त्यांवरील झाडांचा अडथळा दूर करणे आणि वीज पुरवठा पूर्ववत करणे, यावर आमचा भर आहे. सहा ते बारा तासात रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांचं स्थलांतर केल्याने जीवितहानी टळली. पुढील काही तास असंच नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.चक्रीवादळाने वित्तहानी झाली असून दुर्दैवाने डिपीचा विजेचा खांब पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला. नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफ, तटरक्षक दल तैनात केलं होतं. त्यामुळे आपत्ती रोखण्यासाठी मदत झाली, असंही चौधरी यांनी सांगितलं.निसर्ग चक्रीवादळ काल दुपारी साडेबारा वाजता रायगड जिल्ह्यात दिवेकर मुरुड आणि नंतर अलिबागला धडकले. त्यामुळे सहा वाजेपर्यंत पाऊस पडत होता. यामुळे जिल्हा प्रभावित झाला आहे. जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न होता. श्रीवर्धनला मोठा पाऊस झाला असून तिथं फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळू शकते. दोन ते तीन दिवसात पंचनामा करुन अहवाल पाठवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.