पिंपरी-चिंचवाड मध्ये साथीचे आजार पसरु नयेत यासाठी औषध फवारणीसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी – नगरसेवक संदीप वाघेरे

 पिंपरी-चिंचवड:  पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. साथीचे आजार पसरु नयेत यासाठी औषध फवारणीसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच सद्यस्थितीला शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. अशा स्थितीत पावसाळ्यामुळे शहरामध्ये साथीचे आजार देखील बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या तिनही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. डोकेदुखी, ताप येणे, थकवा व खोकला अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. ही सर्व लक्षणे शहरामध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू आजार सदृश्य आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये महापालिकेमार्फत स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने शहराच सर्वच भागांमध्ये रोग प्रतिबंधक ( बॅक्टोडेक्स, डेलथामेथ्रिन, अॅमेंटा, सोडीयम हायपोक्लोराईड) औषध फवारणी तसेच धूर फवारणी ( पायरेथम ) तसेच कचरा कुंडीच्या ठिकाणी पावडर फवारणी करण्यात येत होती. परंतु, आता आरोग्य विभागाची ही कामे अत्यल्प प्रमाणावर होताना दिसून येत आहे. तसेच शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या तीन नद्या प्रामुख्याने वाहतात. या नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणावर साचलेल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महापालिकेच्या वतीने जलपर्णी काढण्याचे टेंडर काढण्यात आले असेल. परंतु ठेकेदार शहरामध्ये जोरदार पाऊस होण्याची वाट पाहत बसलेला असेल यात शंका नाही. या जलपर्णीमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊन त्याचा त्रास नाहक नागरिकांना सोसावा लागणार आहे. शहरामध्ये रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये रखडलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी डबके साचून डासांच्या उत्पत्तीची केंद्र बनू शकतात अशी कामेही त्वरित मार्गी लावणे गरजेचे आहे. कोरोना पार्श्वभूमीवर व पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांची काळजी घेणेसाठी रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच ( बॅक्टोडेक्स, डेलथामेथ्रिन, अॅमेंटा, सोडीयम हायपोक्लोराईड) औषध फवारणी तसेच धूर फवारणी ( पायरेथम ) तसेच कचरा कुंडीच्या ठिकाणी पावडर फवारणी आदी उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्य विभागाची मोहीम आखून व अत्यंत जबाबदारीने व मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या दवाखान्यात सर्दी,पडसे,ताप याचे रुग्ण दाखल झाल्यास व्यवस्थित तपासणी करून, शंका आल्यास घशातील द्रावाची तपासणी करावी. जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण राहणार नाही, असे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Latest News