पुणे जिल्ह्यातील धरणग्रस्त शेतकरी जलसमाधीच्या तयारीत


पुणे : भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता सलग दुसऱ्या दिवशी लहान मुले,वयोवृद्ध नागरिक, महिला व तरुण जलाशयात उतरुण जलसमाधीच्या तयारीत आहेत. त्यामुळे संपूर्ण जलाशयाला पोलिसांचा दिवसरात्र खडा पहारा आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून महिला लहान मुले वयोवृद्ध असे सर्वजण जलाशयात उतरले असून आमच्या हक्काचे पुनर्वसन होईपर्यंत जलवाहिनीचे काम बंद करण्याची मागणी करत आहेत.
‘शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा शासनाला जलवाहिनीचे काम महत्वाचे असेल आणि जलवाहिनीचे काम बंद करणार नसेल तर आम्ही देखील आमच्या भूमिकेवर ठाम असून संपुर्ण कुटुंबासह याच भामा-आसखेड जलाशयात जलसमाधी घेऊ. आता फक्त पाण्यात उतरलो आहे. आम्हाला पाण्यात बुडायला वेळ लागणार नाही,’ असा इशारा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी एका धरणग्रस्त शेतकऱ्याने याच धरणात मागील वर्षी जलसमाधी घेतली होती. त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात आले. मग जलसमाधी घेतल्यावरच सरकार पुनर्वसन करणार असेल तर एक प्रकारे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह धरणाच्या जलाशयात उतरुन रणशिंगच फुंकले आहे.
जलाशयाच्या 18 गावांना पोलिसांचा बंदोबस्त
भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी कुटुंबासह कालपासुन जलाशयाच्या पाण्यात उतरले असून जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून पोलिसांची तगडी फौज धरणग्रस्तांच्या मागे उभी केली आहे. नागरिकांनी जलसमाधी सारखे टोकाचे पाऊल उचलू नये पुनर्वसन मिळावे यासाठी जलसमाधी हा पर्याय नसल्याचे प्रशासनाकडून धरणग्रस्तांना वारंवार सांगितले जात आहे.