आग्रहानंतर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकीय रिंगणात


नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पुन्हा एकदा राजकीय रिंगणात उतरणात आहेत. जनता दल सेक्युलरचे सर्वेसर्वा ८७ वर्षीय देवगौडा हे राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
एचडी देवेगौडा उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली. जेडीएसचे विद्यमान खासदार कुपेंद्र रेड्डी यांच्या जागी देवेगौडा उमेदवारी दाखल करतील. देवेगौडा यांची बिनविरोध वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.
कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागा असून 19 जून रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकमधून एका उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्याइतक्या मतांची बेगमी काँग्रेसकडे आहे. यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दोन जागा भाजपला मिळणे निश्चित मानले जाते.
मल्लिकार्जुन खर्गे यांना निवडून येण्यासाठी आवश्यक मतांव्यतिरिक्त काँग्रेसकडे 14 आमदारांची मते शिल्लक राहणार आहेत. या आमदारांच्या मतांचा वापर काँग्रेस देवेगौडा यांच्यासाठी करण्याचा अंदाज आहे.