”काम असल्याशिवाय” न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही- पुणे बार असोसिएशन

पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पहिल्याच दिवशी शेकडो पक्षकार आणि वकिलांनी गर्दी केली होती. न्यायालयात केवळ निकालावर असलेल्या, गुन्ह्यातून वगळण्याच्या आणि जामीन अशाच प्रकरणात सुनावणी होणार आहे.

मात्र, कामकाज पूर्णपणे सुरू झाल्याचा समज करत ही गर्दी झाली होती. ही गर्दी आटोक्‍यात आणण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अखेर ‘काम असल्याशिवाय न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे गर्दी करू नका असे’ आवाहन केल्यावर काही काळानंतर गर्दी आटोक्‍यात आणण्यात बारच्या पदाधिकाऱ्यांना यश आले.

कारोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे 23 मार्च पासून न्यायालयाचे कामकाज बंद होते. लॉकडाउनच्या काळात न्यायालयात सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने 8 जूनपासून योग्य त्या उपाययोजना करून सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 अश्‍या दोन सत्रांमध्ये राज्यातील न्यायालयाचे कामकाज सुरूकरण्या बाबत निर्देश दिले.

यामध्ये प्रामुख्याने न्यायालयात प्रवेश करण्यासाठी फक्त एकच प्रवेशद्वार असावे, कामकाज असल्याशिवाय वकील, पक्षकारांना न्यायालयात प्रवेश देऊ नये, न्यायालयात प्रवेश देताना प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटाइज करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, प्रवेश देताना प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करावे, काम झाले की तात्काळ न्यायालयाच्या बाहेर निघून यावे आदी सूचना करण्यात आल्या होत्या.

यावेळी पक्षकांराना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार नसल्याने गर्दी न करण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनामार्फत करण्यात आले होते. असे असताना देखील वकील आणि पक्षकारांनी न्यायालयात गर्दी केली होती. मात्र बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी आव्हान केल्यावर काही काळानंतर गर्दी आटोक्‍यात आली.

Latest News