लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल?

मुंबई – मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात अनेक सूट ददेण्यात आली. मात्र नागरिकांनी या सूटचा गैरफायदा घेतला आहे. मरिन ड्राईव्हवरील गर्दी असो वा बेस्ट बसमध्ये चढताना सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा असो. हे असंच सुरू राहिलं तर लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बजावले.
ते म्हणाले की, “आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. कोरोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही.”
“कोरोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली आहे. आरोग्य खराब करण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचं ऐकत आहे. म्हणून मी जनतेचे आभार मानतो. गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपल्याला करोनासोबत जगायला शिकलंच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचं पालन करावंच लागणार आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.