परीक्षा रद्द केल्या ”Oxford” सारख्या विद्यापीठांनी – शरद पवार

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त कोकण दौरा केला. दोन दिवस पवारांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असं चित्र असताना, पवारांनी राज्यपालांवर निशाणा साधला.

“राज्यात अनेक शिक्षण संस्था आहेत. कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. IIT ने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील ख्यातनाम अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठ, अन्य चांगल्या विद्यापीठांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांचे ज्ञान अर्थात आपल्यापेक्षा मोठं असेल”, असा घणाघात शरद पवारांनी केला. अगदीच कोणी काही चुकीचं केलं असा निष्कर्ष काढला असं मला वाटत नाही, असं पवार म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे.

त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांची परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 30 मे रोजी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरुसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची त्याशिवाय श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना केली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर आक्षेप घेऊन, परीक्षा घ्यायची की नाही हे विद्यापीठ कायद्याप्रमाणे ठरवू, असं म्हटलं होतं.

Latest News