लवकर बरा होऊन घरी ये – पंकजा मुंडे

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रातील मंत्री टेन्शनमध्ये आले आहेत. धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या या आजारपणामुळे बहिण-भावातील दुरावलेले नाते जवळ आले आहे. कारण, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी तातडीने धनंजय यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ‘बंधू तब्येतीची काळजी घे, लवकर बरा होऊन घरी ये’ असे पंकजा यांनी धनंजय यांना फोनवरून सांगितले. या निमित्ताने राजकारणापलीकडेही नाती महत्त्वाची असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दापोली येथे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना लवकर स्वास्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.