सुशांतसिंह राजपूतच्या मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध…

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरु झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले असून मैत्रिण रिया चक्रवर्तीसोबत त्याचे संबंध तणावाचे होते, असा दावा सुशांतच्या नोकराने केला आहे.
रियासोबत सुशांतचे संबंध ताणले गेले होते. सातपैकी सहा चित्रपट हातातून गेल्यानेही तो तणावात होता, तसेच सुशांत आर्थिकदृष्ट्याही संकटात जात होता, असा दावा त्याच्या नोकराने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात केला आहे.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत. सुशांतचे वडील बिहारहून मुंबईत दाखल झाले असून त्याच्या पार्थिवावर आज (सोमवार 15 जून) दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले असून गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष होते का, याची माहिती मिळेल.
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. सुशांतच्या पश्चात वडील आणि बहिणी असा परिवार आहे.