सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या ”पोलिसांवार जीवघेणा हल्ला”

सिंधुदुर्ग : तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवार जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वायरी लुडबेवाडी येथे ही घटना घडली. या संपूर्ण घटनेत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या सर्वांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन भावांपासून त्रास होत असल्याने शेजाऱ्यांनी याची तक्रार मालवण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. या तक्रारीच्या चौकशी अर्जासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र तेथे पोलीस पथकावर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन दोघांनी जीवघेणा हल्ला केला. सोमवारी 15 जून रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास वायरी लुडबेवाडी येथे ही घडली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. मालवणमधील वायरी लुडबेवाडी येथील मोहन अनंत लुडबे आणि विवेक अनंत लुडबे या दोन भावांविरोधात नजीकच्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या चौकशीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास टेंबुलकर आणि डी. व्ही. जानकर हे अर्जदारांना भेटायला गेले होते. त्यावेळी मोहन आणि विवेक यांनी पोलिसांवर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन अचानक हल्ला चढवला. त्यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक येथे मागवण्यात आली.

यावेळी झालेल्या झटापटीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर, विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर, मंगेश माने आणि दिलीप खोत यांना दुखापती झाल्या आहेत. यातील हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर याना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके घालण्यात आले आहेत. त्यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत.