देहूरोड येथील: पैशासाठी तीन अल्पवयीन मुलांनी केला खून:

देहूरोड – पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील लोहमार्ग पुलावर आठवड्यापूर्वी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या नागरिकांना एका अज्ञात इसमाचा आढळून मृतदेह आढळून आला. ओळख पटल्यानंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाले. या खूनप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने त्याच्या खुनातील तीन विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले आहे. ‘लॉकडाऊन’मध्ये लुटमारीचा हेतूने खून झाल्याचे अल्पवयीन मुलांनी कबुली दिली आहे. या खुनातील तिघे अल्पवयीन मुलांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे.

दत्तात्रय कृष्णाजी माचर्ला (वय 41, रा. शांतीनगर, सहयोग नगर, भिवंडी, मूळ रा. इंद्रा वसाहत, भवानी पेठ, घोडगे वस्ती सोलापूर) असे खून झालेल्या अज्ञात इसमाचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 8) देहूरोड लोहमार्ग पुलावर खून झालेल्या अज्ञात इसमाच्या अंगावरील कपड्याचे ‘टेलर टॅग’वरून तपास सुरू केला. तपासामध्ये पोलीस कर्मचारी भरत माने यांना मयताच्या नावाची माहिती मिळाली. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्‍त राजाराम पाटील युनिट 5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे यांनी पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला, भरत माने, मयुर वाडकर, नागेश माळी, नितीन बहिरट, ज्ञानेश्‍वर गाडेकर, दयानंद खेडकर, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, श्‍यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रह्मांदे, सावन राठोड, गणेश मालुसरे, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम यांचे तपास कामी दोन पथक तयार केले होते.

पुणे, मुंबई, सोलापूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा असे सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून तिघा विधी संघर्ष बालकांना खून प्रकरणी ताब्यात घेतले. त्यासाठी वडाळा, मुंबई सिटी मार्ग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित बिराजदार, पोलीस कर्मचारी राजकिरण बिलासकर, भूषण भोसले व सागर पाटोळे यांच्या सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

‘लॉकडाऊन’मुळे सोलापूर येथे अडकलेला माचर्ला पैशाअभावी सोलापूर येथून भिवंडी येथे पायी चालत निघाला होता. विजयवाडा, हैदराबाद व रंगारेड्डी अशा वेगवेगळ्या भागातील राहण्यास असणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त तिन्ही मुले हैदराबाद व मुंबई येथे ‘चाइल्ड होम’मध्ये असताना तिघांची मैत्री झाली होती. तिघेही मुंबई येथे निघाले असताना निगडी हद्दीतील भक्‍ती-शक्‍ती चौक येथे माचर्लाची व तिघांची भेट झाली होती. तेथून मुंबईकडे पायी जात असताना एकाने त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती.

मात्र त्यांनी देण्यास नकार केला होता. त्याचा मनात राग धरून देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर माचर्ला झोपला असताना त्यातील एकाने डोक्‍यात दगड घालून त्याच्या जवळील मोबाइल व पैसे काढून पळून गेल्याची कबुली तिघांनी दिली आहे.

खून प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन देहूरोड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Latest News