आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली
नवी दिल्ली – लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. त्यानंतर चीनविरोधात संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गालवान खोऱ्यातील संघर्षावरून आक्रमक भूमिका घेत, ‘आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली, पंतप्रधान शांत का आहेत?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘पंतप्रधान शांत का आहेत?, ते का लपवत आहेत?’, असे सवाल त्यांनी केले आहेत. तसेच ‘आता पुरे झाले. काय घडले ते आम्हाला कळणे आवश्यक आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?’, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री भारत-चीन सैन्यात संघर्ष उफाळून आला. शून्याच्या खाली असणारं तापमान आणि समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावर असलेल्या लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या या संघर्षात भारताच्या एका अधिकाऱ्यासह २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. अरुणाचल प्रदेशातील तुलुंगला येथे १९७५ मध्ये चीनच्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर तब्बल 45 वर्षांनी भारत-चीन सैन्याच्या संघर्षांत ही जीवितहानी झाली आहे.