पुणे भाजपमधील आयारामांचा नाराजीचा सूर…

पुणे – महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहर संघटनेची पुनर्बांधणी सुरू आहे. पक्षाकडून संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात येत आहेत. त्यामुळे, महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा झेंडा घेतलेल्या आयारामांकडून पक्षाच्या संघटनेत स्थान देण्याची मागणी सुरू केली आहे. महापालिकेत आमच्यामुळे भाजप सत्ता सोपान चढली. मात्र, आता आम्हाला संघटनेत काम दिले जात नाही. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशी कुजबूज या नगरसेवकांकडून सुरू आहे. त्यामुळे शहर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची आयात करण्यात आली. या नगरसेवकांच्या जोरावर मागील महापालिकेत 26 नगरसेवक असलेल्या भाजपने महापालिकेतील विक्रमी 98 नगरसेवकांचा आकडा गाठत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या या नगरसेवकांना आश्‍वासनानुसार, पदे देण्यात आली. मात्र, पदांच्या संख्येत पक्षात आलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने काहींना अद्याप काहीच पदे मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली जात आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या नगरसेवकांना केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामापुरतीच पदे देण्यात आली.

प्रत्यक्षात भाजपमध्ये आलेले काही नगरसेवक इतर पक्षांच्या राज्यस्तरीय कार्यकारीनी तसेच पक्ष संघटनेत वाढलेले आहेत. त्यामुळे अशा नगरसेवकांना पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा आहे. मात्र, पक्षाकडून त्यांना वारंवार डावलले जात असल्याने या त्यांच्यामध्ये भाजप विषयी नाराजीचा सूर आहे. दरम्यान, पक्षाकडून आता पुन्हा संघटनात्मक पदे जाहीर केली जात आहेत. त्यामुळे किमान आता तरी आम्हाला न्याय द्यावा, पक्षसंघटनेची पदे द्यावी, अशी मागणी हे नगरसेवक करू लागले आहेत. तसेच, पक्षाने आता लक्ष न दिल्यास वेगळी वाट निवडण्याचा गर्भित इशाराही हे नगरसेवक देऊ लागले आहेत. त्यातच अनेक नगरसेवकांनी आता आपल्या फ्लेक्‍स, बॅनर्सवरून भाजपच्या नेत्यांचे फोटोही हटविण्यास सुरुवात करत आपली नाराजी व्यक्‍त केली.

पक्षाच्या संघटनात्मक नियुक्‍त्या अद्याप संपलेल्या नाहीत. सर्वांना संघटनेत काम करण्याची संधी दिली जाईल. त्यासाठी नगरसेवकांकडूनही सूचना मागवल्या आहेत. त्यामुळे पक्षात कोणीही नाराज नाही. तसेच, कोणी नाराज होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

Latest News