राजू शेट्टी जे शेतकरी तुमच्यासाठी लढले त्यांचा विश्वासघात – सदाभाऊ खोत

सांगली : शरद पवारांनी विधानपरिषद आमदारकीची दिलेली ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. राजू शेट्टी यांनी आज बारामतीत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवर चर्चा झाली होती. यावेळी जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवार आल्यावर घेऊ असं आश्वासन दिलं होतं. आता राजू शेट्टी यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीत राजू शेट्टी यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित झाली आहे.

राजू शेट्टी आणि शरद पवार भेटींवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर घेण्याचा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. राजू शेट्टी शेतकरी चळवळीतून आलेले आहेत ते आमदार होत असतील तर त्याचा आनंद आहे. पण दु:ख एका गोष्टीचं आहे की, ज्या पांडुरंगाला साकडं घालून बारामतीच्या दिशेने आम्ही चालत गेलो, अनेकांच्या पायाला फोड आले, आंदोलनात लाठ्याकाठ्या खाल्ल्या. दोन जणांनी प्राण गमावले ते चुकीचे होते का? तुरुंगात गेले ही माणसं कशासाठी झटली हा प्रश्न आहे असं त्यांनी सांगितले.

खोत म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते बारामतीला गेले असते तर त्याचा जास्त आनंद झाला असता. पण राजू शेट्टी शेतकऱ्यांपासून लांब गेले आहेत, त्यांना शेतकऱ्यांची गरज उरली नाही. जे शेतकरी यांच्यासाठी लढले त्यांचा विश्वासघात झाला आहे. शेतकऱ्यांची पर्वा त्यांना राहिली नाही अशी घणाघाती आरोप सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला आहे.

Latest News