अर्थमंत्र्यांनी देशाला उत्तर द्यावे पेट्रोल, डिझेल महाग का – काँग्रेस नेते मोहन जोशी

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असताना आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती महाग का होत आहेत ? जनतेला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी देशाला द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

भारतातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी सलग ११दिवस पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले. आज ११व्या दिवशी पेट्रोलमध्ये ५५पैसे आणि डिझेलमध्ये ६९पैसे वाढ केली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ७८ ते ८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती ७५ रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. पुण्यामध्ये पेट्रोल ८४.४६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७३.५१ रुपये प्रति लिटर झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ४० डॉलर प्रति बॅरल अशा किमती असताना इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती अवाढव्य वाढवल्या आहेत. गेल्या सहा वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरची एक्साईज ड्यूटी वाढवत नेली. त्यातून सरकारने नफेखोरी केली. सामान्य माणसाला दिलासा दिला नाही. गेल्या काही दिवसात भारतातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी दैनंदिन आढावा घेऊन हळूहळू किंमती वाढवण्याचा सपाटा लावला. या दरवाढीकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लक्ष वेधले होते. सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि एक्साईज ड्यूटी कमी करावी अशी मागणी केली होती. परंतु सरकारने त्याकडे हेतूतः दुर्लक्ष केले. आज पेट्रोल, डिझेलच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जावू लागल्या आहेत त्यामुळे जनतेत असंतोषाचा भडका उडाला आहे. भारतातच एवढी दरवाढ का? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. त्याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी द्यायला हवे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे लागोपाठ ८२ दिवस दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. या काळात कच्या तेलाचे दर घसरले तेव्हा सामान्यांसाठी दर कमी न खरता कमी झालेल्या दरांवरचे उत्पादन शुल्क वाढवले, किंमती स्थिर असल्याचे भासवले यामागे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता असा आरोप मोहन जोशी यांनी केला आहे. सन २००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४० डॉलर झाल्या होत्या तेव्हा मनमोहन सरकारने जनतेला त्याचा लाभ करून दिला आणि पेट्रोलच्य किमती ३६.८१ आणि डिझेल १४.१६ प्रति लिटर होते. एलपीजी गॅस २६१.६० रुपये होता. ही आकडेवारी मोहन जोशी यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

सद्य स्थितीत कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, वेतनकपात झाली आहे, व्यापारात मंदी आली आहे. प्रत्येकापुढे आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत सरकारने इंधनावर लावलेला अवास्तव अधिभार कमी करून, दररोज थोडी-थोडी दरवाढ करण्याचा सपाटा थांवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आहे. पेट्रोल, डिझेलचे दर ५० रुपये प्रति लिटर करावेत अशी काँग्रेसची मागणी आहे आणि ती मागणी न्याय्य असून त्याचा आम्ही पाठपुरावा करू असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Latest News