संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वपदी ”भारत”


नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वपदी भारताची निवड करण्यात आली आहे. या विजयानंतर भारत 2021-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनला आहे. विशेष म्हणजे अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान 128 मतांची आवश्यकता असते, मात्र 192 पैकी 184 देशांनी भारताला भरभक्कम पाठिंबा दिल्यामुळे आशिया खंडातून भारत बिनविरोध निवडून आला. याबाबत अमेरिकेकडून भारताचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
193 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसेच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यातून भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे. भारत आठव्यांदा या परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडून आला असून यापूर्वी 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 या कार्यकाळात भारताने सेवा बजावली होती.
दरम्यान, ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रश्नांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत’, असे ट्विट करत भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडल्याबाबत अमेरिकेने जोरदार स्वागत केलं. तर दुसरीकडे पाकिस्तानचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. ‘या व्यासपीठावरुन उपस्थित होणारे प्रस्ताव भारताने नेहमीच नाकारले आहेत. विशेषत: काश्मीरसारखे मुद्दे. काश्मिरींना त्यांचे हक्क दिले गेले नाहीत आणि त्यांची दडपशाही होत राहिली. भारत तात्पुरता सदस्य झाल्याने आभाळ फाटणार नाही, पाकिस्तानदेखील सात वेळा अस्थायी सदस्य झाला आहे’, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली.