पुणे जिल्हा हादरला आत्महत्येने एकाच कुटुंबातील


पुणे – एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने पुणे जिल्हा हादरला आहे. आपल्या दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर दाम्पत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर परिसरात घडली आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्याने तसेच फोनही न उचलल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौघांनी पंख्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
या दाम्पत्याचा प्रेम विवाह झाला होता, मात्र कुटुंबासोबत काही मतभेद असल्याचे बोलले जाते. अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे आयडेंटीटी कार्ड तयार करण्याचा व्यवसाय करत होते. या दाम्पत्याने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा घोटून नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांच्या घराच्या भिंतीवर कोणालाही जबाबदार धरू नका, कोणाचीही चौकशी करू नका, असा संदेश लिहिलेला आहे. दरम्यान, या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.