8 राज्यांतील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक

नवी दिल्ली – देशाच्या 8 राज्यांतील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. यात आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 3, झारखंडमधील 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. यापैकी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार लढाई होणार आहे. या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी जागांचे चित्र आज सायंकाळीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि प्रत्येक उमेदवार व मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मणीपूरमधील सत्ताधारी आघाडीतील 9 सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येथील एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. भाजपाने येथून लीसेम्बा सानाजाओबा तर काँग्रेसने टी मंगी बाबू यांना उमेदवारी दिली आहे.
तसेच कर्नाटकमधील 4 जागांवर माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपा उमेदवार इरन्ना काडादी आणि अशोक गस्ती हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा उमेदवार नबाम रेबिया यांनी बनविरोध विजय मिळवत भाजपाची सीट काबिज केली आहे.