पुण्यात चांदणी चौकातील ”4 महिन्यांचे बाळ झुडपात सापडले”

पुणे : पुण्यात चार महिन्यांचे बाळ झुडुपात सापडल्याने खळबळ उडाली आहे. चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली या गोंडस बाळाला ठेवलं होतं. चांदणी चौकाजवळ असलेल्या झाडाझुडपात आढळलेली ही चार महिन्यांची मुलगी आहे. बाळाबद्दलची बातमी समजताच वाहतूक पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. कानाला वारा लागू नये म्हणून बाळाच्या डोक्याला कानटोपी गुंडाळलेली होती. कपाळावर छानसा काळा टिळा होता. दृष्ट लागू नये म्हणून गालाला हलकासा काळा टिक्का लावलेला. अंगात फुल बाह्यांचा निळा शर्ट, त्यावर एक पांढरा शर्ट, गुलाबी फुल पँट, पायात मोजे, थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर पांघरलेली निळी शाल असे सर्व तऱ्हेने सुरक्षित असलेले चार महिन्याचे बाळ एका झुडपाखाली ठेवले होते. वाहतूक पोलिसांनी या बाळाला कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर या बाळाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांना या बाळाबद्दल काहीही माहिती असल्यास कोथरुड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक, इतरांकडून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.

Latest News