अपंगांना मिळाला आयुष्याचा जोडीदार कोरोनाचे नियम पाळत उत्साहात विवाहसोहळा

IMG-20210303-WA0006

अपंगांना मिळाला आयुष्याचा जोडीदार कोरोनाचे नियम पाळत उत्साहात विवाहसोहळा

संपन्नजन्मत:च आलेले अपंगत्व, बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे होणारी फरफट, आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी निघून गेलेली लग्नाची वेळ, अशा अपंगांना आयुष्याचा जोडीदार मिळाला. पिंपरी-चिंचवड अपंग विद्यालय निगडी येथे पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळय़ात पाच जोडपी विवाहबद्ध झाली नि त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद फुलला. या जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असा होता.

दिव्यांग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे केवळ पाच जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित केला होता. हे सर्व वधू-वर नांदेड, सातारा, चिपळून, परभणी, वसरणी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यासाठी समाजातील अनेकांच्या सहकार्यातून प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्य, कपाट, दिवाण, पिठाची गिरणी, कपडे, भांडी, इतर साहित्य देण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी दिव्यांग प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र सरडे यांनी सांगितले, की दिव्यांगांना मदतीची खूप गरज असते. कोणाला आईची माया मिळालेली नसते. वडिलांचे छत्र हरपलेले असते. भाऊ बहिणीचे प्रेम मिळालेले नसते. घरची परिस्थिती गरिबीची हलाखीची असते. असे अविवाहित शोधून दिव्यांग प्रतिष्ठान त्यांचे विवाह करून समाजामध्ये एक प्रकारची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. या विवाह सोहळ्यासाठी उद्योग, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.


Latest News