रस्ते गटर्स सफसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करा – संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी (प्रतींनिधी ): शहरातील रस्ते व गटर्स साफसफाई करणेचे निविदा प्रक्रिया रद्द न करता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे निवेदन नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयुक्त श्री. राजीवजी पाटील यांना देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व गटारांची साफसफाई करण्याकरिता आरोग्य विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर निविदेचे पहिले पाकीट दिनांक ०९/१२/२०२० रोजी उघडण्यात आले आहे. परंतु अद्यापही दुसरे पाकीट उघडण्यात आलेले नाही. निविदेबाबत अनेक विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आरोग्य विभागाकडून सदर तक्रारींच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
तथापि तक्रारींवर निर्णय घेण्याएवजी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने व निविदेचे पाकीट उघडण्यास विलंब झाल्याने निविदा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते. शहरामधील रस्त्यांची व गटारांची साफसफाई करण्याचे कामकाज हे नागरिकांचे आरोग्याशी निगडीत असल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. सदर निविदेचा कालावधी हा तीन वर्षाचा असून त्या निविदेचा अंदाजे खर्च १०० कोटीपेक्षा अधिक असल्याने केवळ तक्रारीप्राप्त झाल्याच्या कारणासाठी व निविदा प्रक्रिया विलब झाल्याचे कारणाकरिता पूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करणे योग्य वाटत नाही.
मनपा प्रशासनामार्फत सदर तक्रारींचे निरसन करून तसेच आवश्यक त्या बाबींची शहानिशा करून निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब झाल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्याची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही. शहरातील रस्ते व गटर्स साफसफाई कामकाजाची निविदा वरील कारणास्तव रद्द न करता मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडून नस्ती तपासून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी संदीप वाघेरे यांनी निवेदनात केली आहे.