अमित आढाव या विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणाची जवाबदारी महानगरपालिकने घ्यावी

पिंपरी झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेतील वास्तव्य, कोणाचाही आधार नसलेल्या आणि जेमतेम पगार असलेल्या कल्पना आढाव यांनी आपल्या  मुलाला अत्यंत हालअपेष्टा सहन करत डॉक्टर केले. पुढील शिक्षणासाठी त्याला इंग्लंडला जाण्याची संधी उपलब्ध झाली. मात्र, बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या कुटुंबाने मदतीचे आवाहन केले आहे.

कल्पना आढाव असे या महिलेचे तर अमित हे मुलाचे नाव आहे. पिंपरीत  झोपडपट्टीत छोटय़ाशा जागेत ते राहतात. गेल्या १४ वर्षांपासून कल्पना आढाव या  पालिकेच्या रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सुरुवातीला त्यांना अवघे तीन हजार रूपये पगार मिळत होता. आता १४ हजारापर्यंत मिळतो. मुलगा अमित याला शिकून मोठय़ा हुद्दय़ावर बसलेले पाहायचे त्यांचे स्वप्न होते. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होण्यासारखे नव्हते. मात्र, त्यांनी शर्थीने प्रयत्न केले

. रुग्णालयातील कामाबरोबरच अनेकांकडे त्यांनी धुणी-भांड्याचे  कामही केले. बऱ्याच  वर्षांचा खडतर प्रवास पार करत त्यांनी मुलाला जिद्दीने डॉक्टर केले. आता पुढील उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी त्याला मिळाली आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे तो तिकडे जाण्याचा विचारही करू शकत नाही. आतापर्यंत कसेबसे त्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.        परंतु त्याचा आता पुढील उच्चशिक्षणाचा खर्च करायची कुटुंबाची ऐपत नाही. अमित आढाव याच्या उच्चशिक्षणची जबाबदारी महापालिकेने स्वीकारून त्याला सर्वोतपरी मदत करावी अश्या आशयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मा.महापौर व मा आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले.