करोनाकाळात भावाच्या मदतीला उभ्या राहिलेल्या अनिता गोसावी यांनी शेकडो रुग्णांची केली वाहतूक…

पुणे – करोनाकाळात भावाच्या मदतीला उभ्या राहिलेल्या गोसावी यांनी शेकडो रुग्णांची वाहतूक केली. यात करोनाबाधित रुग्णांसह मृतदेहांचादेखील समावेश आहे. चिंचवड परिसरातील अनिता गोसावी यांचे शालेय शिक्षण पाचवीपर्यंतच झाले आहे. रुग्णवाहिका चालक भावाला करोनाची बाधा झाली. त्यामुळे भावाकडून गाडीसाठी चालकाचा शोध सुरू झाला. तेव्हा अनिता यांनी ‘मी गाडी चालवते’ असा निर्धार करत रुग्णवाहिकेचे सारथ्य करण्यास सुरुवात केली. ऑगस्टपासून त्यांनी रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले. ‘मी स्कूलबसमध्ये सहायक म्हणून काम करत होते. बस रिकामी असताना चालकांना बस चालवण्याचे शिकवण्याची विनंती केली. त्या काकांनी बस चालवायला शिकवली. त्यानंतर ‘परफेक्‍ट ड्रायव्हिंग’ शिकण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतल्याचे गोसावी यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये भावाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा तो चालक शोधत होता. त्यावेळी मीच गाडी घेऊन जाते, असे त्याला सांगितले. सुरुवातीला काही दिवस भीती वाटली. पहिल्या रुग्णाची वाहतूक करताना ‘जमेल का’ असा प्रश्‍न भेडसावत होता. एकटीच महिला चालक असल्याने वेगळेच वाटायचे. मी नवीन असताना सहकारी चालकांची मोलाची मदत झाली. आता मला सवय झाली आहे. मी वायसीएम रुग्णालयातून भोसरीपर्यंत करोना बाधितांच्या मृतदेहांची वाहतूक केली असल्याचे गोसावी म्हणाल्या. सुरुवातीला आईच्या मनात थोडी भीती होती. मात्र, मला घरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलांना माझा अभिमान वाटतो. आजुबाजुच्या नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता. अनेक वाहनचालक रस्त्यावर थांबवून कौतूक करतात, प्रोत्साहन देतात’ असे अनिता म्हणाल्या. महिला कशात कमी नाहीत. त्यांनी ठरवले तर त्या काहीही करू शकतात. महिलांनी आपल्या पायावर उभे राहिले म्हणजे प्रश्‍न नाही. करोनाकाळात डॉक्‍टर, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांबरोबर समाजाला रुग्णवाहिका चालकांचे महत्त्वदेखील पटले. आतापर्यंत रिक्षापासून ते रेल्वेपर्यंत विविध प्रवासी वाहनांचे सारथ्य महिला समर्थपणे करत आहेत. मात्र, रुग्णवाहिकेच्या सारथ्याची धुरा चिंचवडच्या अनिता गोसावी अत्यंत जिद्दीने सांभाळत आहेत.

आज जागतिक महिला दिन. २८ फेब्रुवारी १९०९ सालापासून जागतिक महिला साजरा केला जातो. हा दिवस सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीसाठी महिलांना समर्पित केला जातो. आज खास महिला दिनानिमित्ताने राज्यातील महिला खास गिफ्ट देण्यात आले आहे. सध्या कोरोना लस घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ५ ‘लेडीज स्पेशल’ कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी राज्यात महिला कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात एकूण १८९ महिला लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून यामधील सर्वाधिक १९ केंद्र ही ठाणे जिल्ह्यात आहेत. या लसीकरण केंद्रामध्ये फक्त महिलांच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्यात करोना लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला असून १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरू आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना आणि वय ४५ ते वय ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयामधील लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जात असून खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर २५० रुपयांत दिली जात आहे. ही लस घेण्यासाठी ‘को विन’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा असून थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.