राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी

मुंबई | आगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने केली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीला विरोध केला आहे. निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची एक महत्वाची बैैठक आज विधानसभेत पार पडली. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले असल्याची माहिती समोर आली आहे

.विधानभवनाच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उर्जामंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदर यांच्यासह इतरही आमदार उपस्थित होते. यात राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेवर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या अधिवेशनात नाही तर पुढील अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे, अशी माहिती आहे.

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून सरकार पाच वर्ष टिकणार नाही, अशी टीका विरोधकांकडून सतत केली जात होती. अशात सरकारमधील वाद वारंवार चव्हाट्यावर येताना दिसत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहे.दरम्यान, या अधिवेशनाचे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पुढील अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते किंवा बिनविरोध अध्यक्ष निवडला जाऊ शकतो.