ठाकरे सरकारचा सचिन वाझे जावई आहे का?

मुंबई |आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला. तसेच सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?, असा सवालही प्रविण दरेकरांनी केला

.मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणात सचिन वाझे यांचा सहभाग असावा, असं प्रथमदर्शनी दिसत आहे. विमला मनसुख यांनीही सचिन वाझे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सचिन वाझे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.मनुसख हिरेन प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे

. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.दरम्यान, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट करण्याची ठाकरे सरकारची मोडस ऑपरेंडी एकाचप्रकराची असल्याचा आरोप प्रविण दरेकरांनी केला आहे.

मनसुक हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून सचिन वाझे यांच निलंबन करण्यात यावं, अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून विरोधीपक्षाकडून केली जात आहे. तर काल गृहमंत्री अनिल देशमुखांनी अन्वय नाईक प्रकरणावरून एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून अनिल देशमुख यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग प्रस्ताव सभागृहात दाखल केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. याला उत्तर देत सर्वोच्च न्यायालयाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. ही हत्या नसून आत्महत्या आहे

असं कोर्टाने स्पष्ट केलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहात देखील सांगितला. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना देखील न्यायालयाचा अवमान करणारं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. गृहमंत्री माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, विरोधकांना बोलू दिलं जात नाही. इतकंच नाही तर गृहमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे. दरम्यान, फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना अशोक चव्हाण यांच्याविरूद्ध देखील हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं आहे.