पुण्यात ३ एप्रिलपासून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी

पुणे | पुण्यात ३ एप्रिलपासून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी लावण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनं बंद ठेवण्यात येतील. गर्दीची होणारी ठिकाणं म्हणजेच पीएमपीएल बससेवा, मॉल, हॉटेल तसेच धार्मिक स्थळं पुढील सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.हॉटेल बंद असली तरी फूड डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे संध्याकाळी ६ वाजेनंतर सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश असताना फूड डिलिव्हरीला मात्र परवानगी देण्यात आलेली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन लागणार की आहेत ते निर्बंध अधिक कठोर होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. लॉकडाऊन नको अशी भूमिका गेल्या काही दिवसांपासून सर्वच स्तरातून घेतली जात होती. पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत या सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घेण्यात आला असून लॉकडाऊन न लावता पुण्यातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.त्यामुळे घरी बसल्यावर संध्याकाळी ६ नंतर देखील फूड ऑर्डर करणं आता शक्य होणार आहे.

अनेक आयटी कर्मचारी तसेच बॅचलर्स संध्याकाळच्या वेळी ऑनलाईन फूड ऑर्डर करत असतात, त्यामुळे फूड डिलिव्हरीला संध्याकाळी ६ नंतर बंदी घातली असली तर या लोकांचे मोठे हाल झाले असते, याशिवाय कोरोनामुळे आधीचं कंबरडं मोडलेल्या हॉटेल व्यवसायाला देखील मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे यासंदर्भात काय निर्णय होतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर पालकमंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.