कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास केंद्राची परवानगी

पुणे – ४५ वर्षांवरील कामगार, अधिकाऱयांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशी मागणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने यांनी जिल्हाधिकारी, महापालिका यांच्याकडे केली होती.कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास परवानगी देण्यास केंद्र सरकारने बुधवारी अखेर मंजुरी दिली. या बाबतचे आदेश राज्य सरकारला आले आहेत. पुण्यातील २५ खासगी कंपन्यांनी त्यांच्या सुमारे १२ हजार कर्मचाऱयांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्यासाठी महापालिकेचे सहकार्य मागितले आहे. शासकीय कंपन्यांसाठीही केंद्र सरकारने हा आदेश लागू केला आहे.
देशातील अनेक औद्योगिक संघटनांनीही या बाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी सर्व राज्यांसाठी आदेश लागू केला. त्यात कामाच्या ठिकाणी ११ एप्रिलपासून लसीकरण सुरू करण्यात यावे, असे म्हटले आहे. तसेच त्यासाठी कशी तयारी करायची, या बाबतची मार्गदर्शक तत्त्वेही पाठविली आहेतपुणे आणि परिसरातील सुमारे २५ कंपन्यांनी ‘एमसीसीआयए’मार्फत जिल्हा प्रशासनाकडे या बाबत या पूर्वीच संपर्क साधला आहे. त्यांच्या १२ हजार कर्मचाऱयांचे लसीकरण कंपनीतच झाल्यास महापालिका किंवा स्थानिक प्रसासनावरील ताण कमी होईल. तसेच लसीकरणासाठी डॉक्टर व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचीही तयारी या कंपन्यांनी या पूर्वीच दर्शविली आहे. मात्र, केंद्र सरकारने आदेश दिल्यामुळे आता शहर आणि परिसराती सुमारे २०० हून अधिक कंपन्यांमधील कामगारांचे लसीकरण होऊ शकते. दरम्यान, या बाबत ‘एमसीसीआयए़ने दोन्ही महापालिकांशी बुधवारी सायंकाळी चर्चा केली. गुरुवारी या बाबत बैठक घेऊन आराखडा निश्चित करण्यात येईल, असे ठरल्याची माहिती गिरबने यांनी दिली.