आमदार निधीतील 25 लाखाचे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करा :आ जगताप

पुणे | राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी राज्य सरकार वर्षाला प्रत्येकी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करते. आमदारांनी हा निधी एका वर्षांत वापरताना एक काम 25 लाखांपर्यंतच्या खर्चाचे असणे बंधनकारक आहे. वर्षाला 4 कोटींचा निधी कोणत्या विकास कामांवर खर्च करता येईल याची एक यादीच सरकारकडून तयार करण्यात आली आहे. या यादीतील विविध प्रकारच्या कामांनाच आमदारांनी प्राधान्य देणे अपेक्षित आहेपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी आमदार निधीतील 25 लाख रुपयांतून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यात यावेत, असे पत्र चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी आमदार निधी वापरण्याबाबत राज्य सरकारकडून “खास बाब” म्हणून मान्यता घेण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना केली..आमदारांनी सुचविलेल्या कामांवर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून अंमलबजावणी केली जाते. परंतु, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावात वैद्यकीय सुविधांवर आमदार निधीतील रक्कम खर्च करता येत नसल्याचे समोर आले आहे. कारण आमदार निधी खर्च करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या विविध प्रकारच्या कामांच्या यादीत सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांच्या कामांचा समावेश नाही.

या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.सध्या कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहज उपलब्ध असणे गरजेचे झाले आहे. परंतु, तुटवडा निर्माण झाल्याने आणि काळाबाजार होत असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना रेमडेसीवर इंजेक्शन मिळत नसल्याचे वास्तव आहे.

रुग्णांचे नातेवाईक दिवसभर रांगेत उभे राहून सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे. परिणामी गंभीर लक्षणे असलेल्या आणि चिंताजनक स्थिती बनलेल्या काही गोरगरीब रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आमदार जगताप यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून आमदार निधीतील 25 लाख रुपयांतून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याची मागणी केली होती.

रेमडेसिवीर इंजेक्शन ही वैद्यकीय सामुग्री असल्याने त्याच्या खरेदीसाठी आमदार निधीचा वापर करण्यास त्यांनी पत्राद्वारे सांगितले होते. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी आमदार निधी अनुज्ञेय नसल्याचे कळविले आहे.

मात्र सध्या गोरगरीब रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीस आमदार निधीतील 25 लाख रुये खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडून “खास बाब” म्हणून मान्यता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.