रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका- आरोग्य मंत्री राजेश टोपे

जालना: राजेश टोपे यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरित्क पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगर परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.राज्यात तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानेच या इंजेक्शनचा पुरवठा करावा, असे निर्देश राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

देयके तपासणाऱ्या परीक्षकांच्याही तक्रारी

खासगी दवाखान्यात कोविड बधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणारी देयके योग्य दरानुसार देण्यात येत नसल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. रुग्णांना उपचारापोटी देण्यात येणारी देयके तपासण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली असली तरी हे परीक्षक काटेकोरपणे देयकांची तपासणी करत नसल्याचे या तक्रारीवरून समजते. त्यामुळे यापुढे प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल व नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची सूचना टोपे यांनी केली. तसेच, कोरोनाबधित गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना आणून देण्याची सक्ती खासगी रुग्णालकडून करण्यात येत असून हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवशकता आहे, त्यांनी त्यांची मागणी जिल्हा प्रशासनानेकडे करावी. जिल्हा प्रशासनाने त्यांना आवश्यकता असलेल्या इंजेक्शनस मागणीनुसार पुरवठा करावीत. परंतु यापुढे कुठल्याही रुग्णांना इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.

घरीच उपचार करणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये आणा

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत असून रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत असून घरीच राहत आहेत. बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करत त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात यावेत. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये वाढ करत बेडची क्षमता वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटर अथवा दवाखान्यात आणण्यासाठी प्रशासनाने वाहनाच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचनाही केल्या.

विद्यूत दाहिनी तातडीने उभारा

दिवसेंदिवस कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजनची मागणीही त्याप्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश देत जालना शहरामध्ये विद्यूत दाहिनी उभारण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने 1 मेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. काम नसतानाही विनाकारण अनेकजण बाहेर फिरत आहेत. जिल्ह्यात वाढत चाललेली कोरोना बधितांची संख्या कमी होण्यासाठी कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात निर्बंधाची पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. जालना जिल्ह्यात लसीकरणाचे सुक्ष्म व काटेकोर असे नियोजन करण्याच्या सूचना करत लसीकरणाच्या बाबतीत जालना जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.