शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट,


आमचा कोणावरही आरोप नाही, मुलीच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले. त्यानंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता, असा जबाब तरुणीच्या पालकांनी पुण्यातील वानवडी पोलिसांकडे नोंदवल्याची माहिती आहे.
राज्यभरात गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांसमोर तरुणीच्या आई वडिलांनी जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राठोड यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राठोड यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची भूमिका घेत राजीनामा दिला होता. मात्र आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काही दिवसांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. मुंबईला येऊन 28 फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला होता.
संबंधित तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.